सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील जवान प्रवीणकुमार सुरेश इंगळे (वय ४०) यांचे लखनऊ येथे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ असल्याने तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला.
जवान इंगळे यांच्या निधनाची बातमी समजताच खटाव ताललुक्यासह शिरसवडी गावावर शोककळा पसरली आहे. खटाव तालुक्यातील जवान प्रवीणकुमार इंगळे हे गेली २२ वर्षे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरसवडी येथे झाले. सात ते आठ महिन्यापूर्वी ते गावी आले असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर पुणे येथे उपचार घेऊन ते लखनऊला हजर झाले होते.
दरम्यान, काल गुरुवारी त्यांना त्रास जाणवू लागल्याने तेथील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. शिरसवडी येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.