सातारा प्रतिनिधी । दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी कोरेगाव तालुक्यातील भाडळे खोऱ्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश खरात (वय ३७, रा. भाडळे, ता. कोरेगाव) यांचा अचानक बेशुद्ध पडल्याने मृत्यू झाला. जवानाला कर्तव्यावर असताना वीरमरण आल्याने भाडळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
वीरजवान प्रकाश खरात यांचे शालेय शिक्षण भाडळे येथे झाले असून वयाच्या १७ व्या वर्षी ते केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले. गेली २० वर्षे ते प्रामाणिकपणे सेवा बजावत हेड कॉन्स्टेबल पदापर्यंत पोहोचले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११६ बटालियनमध्ये ते अनंतनाग येथील जिल्हा कारागृहात तैनात होते. सोमवारी नियमित ड्युटीदरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना अनंतनागच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात दाखल करताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत सातारा जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव मूळ गावी भाडळे येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रकाश खरात यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व आई असा परिवार आहे.