सातारा प्रतिनिधी | केंद्रीय राखीव पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल प्रकाश खरात (वय 37, रा. भाडळे, ता. कोरेगाव) यांना दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झाले. बुधवारी त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी भाडळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता. कुटुंबियांसह ग्रामस्थांनी त्यांना साश्रूनयनांनी भावपूर्ण निरोप दिला.
वीर जवान प्रकाश खरात यांनी शालेय शिक्षण भाडळे येथे घेतले, त्यानंतर वयाच्या 17 व्या वर्षी ते केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती झाले होते. वीस वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली. दलाच्या 116 बटालियनमधील जी कंपनीमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले प्रकाश खरात हे अनंतनाग येथील जिल्हा कारागृहात बंदोबस्तासाठी तैनात होते. सोमवारी ते कर्तव्य बजावत असताना अचानक बेशुद्ध पडले. सहकार्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. केंद्रीय राखीव पोलिस दलामार्फत खास विमानाद्वारे त्यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले.
खराब हवामानामुळे आणि काश्मीरमध्ये होणार्या बर्फवृष्टीमुळे पार्थिव आणण्यामध्ये मोठा विलंब झाला. बुधवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक स्वतः हेड कॉन्स्टेबल प्रकाश खरात यांचे पार्थिव घेऊन भाडळे येथे दाखल झाले. फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. अभय तावरे, कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण देसके, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, किन्हईच्या मंडल अधिकारी श्रीमती भोसले, माजी सरपंच सुनील घोरपडे, वाठार स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश माने, भाडळे ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा विस्तार अधिकारी ढेंबरे, विस्तार अधिकारी संदीप दीक्षित यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पोलिस दलाच्यावतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देवून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कोरेगाव तालुक्यातील आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, भाडळे खोर्यातील माजी सैनिक उपस्थित होते.