सातारा प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुतीतील नेत्यांकडून मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली गेली नसल्याने आक्रमक झालेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी थेट निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशाराच दिला आहे. यापूर्वी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात आणि सातारा जिल्ह्यातही याचा प्रत्यय आला. त्यानंतर विधानसभेबाबत काय करायचे? याबाबत जरांगे-पाटील उद्या दि. २० रोजी निर्णय घेणार असून सातारा जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा समाजबांधवांचेही लक्ष आंतरवालीच्या बैठकीतील निर्णयाकडे लागले आहे.
मराठा आरक्षणाबाबत आचारसंहिता लागेपर्यंत निर्णय न झाल्यामुळे मराठा समाजात नाराजी आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबाबत विधानसभेला काय निर्णय घ्यायचा? याबाबत जरांगे-पाटील दि. २० रोजी भूमिका स्पष्ट करणार आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व इच्छुकांना दि. १७ रोजी आंतरवालीत चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चातील कोणीही समन्वयकाने अर्ज केला नसल्याची माहिती मिळत आहे. याबाबत माहिती घेतली असता, दि. २० रोजीच्या जरांगे-पाटील यांच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जरांगे-पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या जरांगे राजधानी सातारा ग्रुपच्या माध्यमातून इच्छुकांनी घोंगडी बैठका सुरू केल्या आहेत. जर निवडणुकीत लढायचं ठरलं तर प्रत्येक मतदार संघातून मराठा क्रांती मोर्च्याचा उमेदवार उभा राहणार यात शंका नाही. आणि जर पाडायचं ठरलं तर कुणासोबत जायचं याचाही निर्णय लवकरचा होणार आहे.
सातारा, कोरेगाव, कराड उत्तर, दक्षिण, पाटण मतदारसंघांत संख्याबळ
मराठा क्रांती मोर्चाचा विचार जर केल्यास सातारा, कोरेगाव, कराड उत्तर, दक्षिण, पाटण या पाच विधानसभा मतदारसंघांत मराठा समाज बांधवांची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणच्या तुलनेत माण आणि फलटण मतदारसंघांत मात्र मराठा समाजाची संख्या काहीशी कमी आहे. या ठिकाणी जरी संख्या कमी असली तर ते जरांगे पाटील जे सांगतील तेच करणार हे नक्की!
२० जिल्ह्यात होणार पुन्हा बैठक
सोमवारी जरांगे-पाटील यांनी गुरुवारी अनंतरवाली सराटी येथे नुकतीच बैठक घेतली. या बैठकीवेळी त्यांनी विधानसभानिवडणुकीसाठी असलेलया इच्छुकांशी चर्चा केली. या बैठकीवेळी साताऱ्यातून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांपैकी कुणीही अर्ज केलेला नसला तरी जरांगे- पाटील यांनी एकदा निर्णय घेतला की, त्याच्या अंमलबजावणीसाठी २० जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाची बैठक सोमवार, दि. २१ रोजी घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत जिल्ह्यात यावेळी पुढील रणनीती आखण्यात येणार आहे.