350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त उद्यापासून सातारकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा महानाट्य’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत “जाणता राजा” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 22, 23 व 24 फेब्रुवारी, 2024 सलग तीन दिवस सायंकाळी 6 ते 9:30 या वेळेत जिल्हा परिषद मैदान सातारा येथे आयोजन करण्यात आलेले आहे. “जाणता राजा” हे महानाट्य पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महानाट्य पाहण्यासाठी विनाशुल्क प्रवेश पासची व्यवस्था केलेली असून सदर पासेस जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व नगरपालिका कार्यालय येथून उपलब्ध करुन घेता येतील. सदर पासेस दाखवल्यानंतरच महानाट्य पाहण्यासाठी प्रवेश दिला जाईल. महानाट्य पाहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सैनिक स्कूल, सातारा यांचे मैदानावर वाहनतळाची सोय करण्यात आलेली आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

कार्यक्रमाची सुरुवात आरतीने होणार असून त्यानंतर “जाणता राजा” या महानाट्याचा प्रयोग सुरु केला जाईल. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी “जाणता राजा” या महानाट्याचा आस्वाद घेणेकरीता मोठ्या संख्येने उपस्थित राहणेबाबत डुडी यांनी आवाहन केले आहे.