कराड प्रतिनिधी | जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय, कराड मध्ये अयोध्या येथे होत असलेल्या श्री राम मंदिर उद्घाटन व श्री राम प्राण प्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या मैदानावर ‘जय श्री राम व धनुष्यबाण’ मानवी साखळीच्या माध्यमातून साकारले.
जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अनिल कुलकर्णी, संचालक दीपक कुलकर्णी, स्वाती भागवत यांच्या हस्ते श्री राम व श्री हनुमान यांच्या मूर्तीचे पूजन केले. विद्यार्थांसाठी आकर्षण असलेल्या मोठ्या श्री राम प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेतील सर्व विद्यार्थांनी या निमित्ताने रामरक्षा पठण केले. विद्यार्थांनी दिलेल्या
‘जय श्री राम…जय जय श्री राम व जय सियाराम..जय जय सियाराम’ अशा घोषणांनी शालेय वातावरण प्रफुल्लित झाले. सर्व मैदानावर भगवे ध्वज लावून विद्यार्थांनी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रम व श्री राम प्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभाग नोंदवला अशी भावना प्रत्येकाच्या मानत निर्माण झाली होती.
या निमित्ताने शाळेमध्ये श्री राम व रामायणातील प्रसंग यावर विद्यार्थांनी चित्र काढून त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले. शाळेचे समन्वयक विजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची रचना व आखणी केली. तसेच अयोध्या येथे होत असलेल्या राम मूर्तीची विशेष शिल्पकलेची व मूर्ती निर्मितीतील धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. संचालिका स्वाती भागवत यांनी शाळेच्या या उपक्रमाचे व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. देशभर साजरा होत असलेला हा महत्त्वाचा सोहळा सर्वांनी पहावा व त्यामध्ये सामील व्हावे असेही आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले.
या उपक्रमाचे मुख्याध्यापिका रुपाली तोडकर व सोनाली जोशी यांनी नेटके नियोजन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी मैदानातील आखणीसाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
क्रीडा शिक्षक दीपक पाटील व सुहास पाटील, महेंद्र जोशी, अमोल साठे, अनंत निकम, सुनील भोसले, अशोक गायकवाड यांनी तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.