पाटण प्रतिनिधी । कोयना धरणातून आज मंगळवारी दुपारपासून २ हजार ६०० क्युसेकने पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले. कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
सातारासह सर्व जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता चांगलीच वाढली आहे. पाऊस नसल्यामुळे सातारासह सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. पुरेसा पाणीपुरवठा नसल्यामुळे रब्बी पिकांसह द्राक्ष बागाही वाळण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेतून पाणीपुरवठा चालू आहे. यामुळे कृष्णा नदीत पुरेसा पाणीसाठा झाला नसल्यामुळे सांगली, भिलवडीसह अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी होती.
कृष्णाकाठाच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार pic.twitter.com/iRyww0bjKH
— santosh gurav (@santosh29590931) February 20, 2024
दरम्यान, यापूर्वी देखील आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर व अमोल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी कोयना धरणाचे स्लुइस गेट उघडून ५०० क्युसेक आणि कोयना धरण पायथा विद्यु त गृहाचे दोन्ही युनिट सुरू करून त्याद्वारे दोन हजार १०० असे दोन हजार ६०० क्युसेकने धरणातून विसर्ग सुरू आहे. कोयना धरण व्यवस्थापनच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह पाणीपुरवठा योजना असणाऱ्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.