कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. ती आज सकाळपासून सुरू केली आहे. सोशल मीडियाचा कोणत्याही स्वरुपाच्या अफवा पसरू नये यासाठी 72 तास इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे लाखो रुपयांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार तसेच कामे ठप्प झाली होती. तर घटनेतील 16 जणांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुसेसावळी या ठिकाणी घडलेल्या दंगलीप्रकरणी औंध पोलिसांनी बुधवारी 6 जणांना अटक केली. याप्रकरणी दोन दिवसांत अटक केलेल्यांची संख्या 15 असून, त्यांना वडूज न्यायालयाने दि. 16 रोजीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.बु गवधवारी जोतीराम भाडुगळे, किशोर कदम, जयराम नागमल, किरण घार्गे, विजय निंबाळकर, सोमनाथ पवार, शिवाजी पवार, श्रीनाथ कदम, दादासाहेब माळी (सर्व रा. ज.स्वा. वडगाव) यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. याचबरोबरच महेश कदम, विकास घार्गे (रा. ज.स्वा. वडगाव), अनिरुद्ध देशमाने (रा. पुसेसावळी), नीलेश सावंत, सागर सावंत, प्रमोद कोळी (रा. गोरेगाव-वांगी) हे देखील अटकेत आहेत. या 15 जणांना बुधवारी वडूज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या सर्वांना शनिवार, दि. 16 रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी एकूण 3 गुन्हे दाखल असून, त्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्ह्या देखील पोलिसांनी दाखल केला आहे.
दरम्यान या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सातारा जिल्ह्यातील कराड, पुसेसावळी, सातारा शहर यासह अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला होता. या राड्यात एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी झाले. त्यातील 15 जणांना शनिवार दि. 16 रोजी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर गेल्या दोन ते दिवसापासून जिल्ह्यातील ठप्प झालेले व्यवहार आज इंटरनेट सेवा सुरळीत झाल्यामुळे पुन्हा सुरू झाले आहेत.
आक्षेपार्ह पोस्टनंतर झालेल्या दंगलीत नूरसहन शिकलगार (वय 27) यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले तर 34 जणांना अटक केली असून 4 जण फरार आहेत. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांकडून CCTV फुटेजची तपासणी केली जात असून काही युवकांना ताब्यात घेतले आहे. तसेच बुधवारी सकाळी बाजारपेठ सुरू करण्यास प्रशासनाने आवाहन केले. यावेळी व्यापारी, नागरिकांनी एकत्रित येत या घटनेशी संबध नसलेल्यांना अटक होत असल्याचे म्हटले. त्यानंतर आज गुरुवार सकाळपासून बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
कराड शहरात बंदोबस्त तैनात
या परस्परविरोधी आरोपांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून कराड शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोपनीय विभागही हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. वरिष्ठ अधिकारी सातत्याने सर्व जाती-धर्मातील प्रतिष्ठीतांच्या बैठका घेऊन सामाजिक सलोखा आणि शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राखीव दलाच्या तुकड्याही कराडमध्ये दाखल झाल्या आहेत.