सातारा प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या फळबागांना हवामानाच्या धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात पेरू, डाळिंब आणि सीताफळासाठी ही योजना आहे. यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजारांपासून १ लाख ६० हजारांपर्यंत भरपाई मिळणार आहे.
कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीत फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. कारण, फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, या फळबागांचे अपेक्षित उत्पादन न आल्यास शेतकऱ्यांना तोटाही होतो. ही बाब विचारात घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामानाच्या धोक्यासाठी विमा संरक्षण देऊन आर्थिक स्थैर्य अबाधित केले आहे. यासाठी राज्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यात २०२५-२६ वर्षासाठी मृग बहरातील पेरू, डाळिंब आणि सीताफळ यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे. या विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के हप्ता रक्कम भरावयाची आहे.
पेरूसाठी ७० हजार भरपाई मिळणार असून मृग बहरातील डाळिंबासाठी हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. तर पेरू आणि सीताफळासाठी प्रत्येकी ७० हजार रुपये संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे.
कोणत्या पिकाला पीक विमा योजनेत सहभागाची अंतिम मुदत
डाळिंब : 14 जुलै अंतिम मुदत
पेरू : 25 जून
सीताफळ : 31 जुलै ही शेवटची मुदत
विमा कोठे भरावा; कागदपत्रे काय?
फळपिकांचा विमा उतरावयाचा आहे, तेथील ७/१२ आणि खाते उतारा (८ अ) घेऊन राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरूनही विमा हप्ता भरण्याची सुविधा आहे. ७/१२ उतारा प्राप्त होत नसल्यास संबंधित शेतात 3 अधिसूचित पीक असल्याचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.