कराड उत्तर मतदारसंघाबाबत आढावा बैठकीत विक्रांत चव्हाणांच्या अधिकाऱ्यांना सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील तयारीचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घेतला आहे. यासाठी आयोजित बैठकीत विविध ३० समित्यांची स्थापना करण्यात आली असून निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.

कराडमधील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांच्या मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा खटावचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सहायक निवडणूक अधिकारी तथाकराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, कराडचे परीविक्षाधीन तहसीलदार अनिकेत पाटील, नायब तहसीलदार महेश उबारे, बाजीराव पाटील, कराड व रहिमतपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासह सर्व मध्यवर्ती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाचे सूक्ष्म नियोजन करण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिला. एकूण विविध तीस समित्या प्रशासनाने गठित केल्या आहेत.

मनुष्यबळ व्यवस्थापन, नामनिर्देशन पत्र दाखल करणे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व्यवस्थापन, वाहतूक व परिवहन सुरक्षा, प्रशिक्षण व्यवस्थापन, साहित्य व्यवस्थापन, आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक खर्च व निरीक्षण, मतदार जनजागृती व शिक्षण, कायदा व सुव्यवस्था, टपाली मतदान व गृह मतदान, माध्यम, स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थापन, संगणकीकरण, सायबर सुरक्षा, भरारी पथके, दृश्य चित्रीकरण पथके निवडणुकीसाठी नेमण्यात आली आहेत.