सातारा जिल्हा परिषदेच्या ‘मिशन धाराऊ’ अभियान राज्यभर राबविण्याच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने एक अभियान सुरु करण्यात आले होते. ते आता राज्यभर राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढविणे, बाळाच्या सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराचे प्रमाण वाढविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने ‘मिशन धाराऊ माता दुग्धामृतम्’ अभियान सुरू केले होते. या अभियानाचे यश पाहून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे अभियान राज्यात राबविण्याबाबत सूचना केली आहे.

मुंबईत मंत्रालयात याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे उपस्थित होत्या. यावेळी मंत्री तटकरे यांनी ‘मिशन धाराऊ’ तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर या अभियानाचा उद्देश पाहून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत त्यांनी संबंधितांना सूचनाही केली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने ‘मिशन धाराऊ’ अभियान राबविण्यात येत आहे. याचा फायदा गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांना झालेला आहे.

नेमकं काय आहे अभियान?

सातारा जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून ‘मिशन धाराऊ’ हे अभियान २०२१ मध्ये सुरू केले होते. यामधून जिल्ह्यात स्तनपान आणि शिशुपोषण विषयाची सामाजिक लोकचळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता; कारण, बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती आणि कुप्रथा पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठी मार्गदर्शनाची गरज भासते. अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ अभियान सुरू आहे. या अभियानाचा खूप चांगला फायदा झाला.