सातारा जिल्ह्यात विशेष आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्याबाबत नोडल अधिकाऱ्यांकडून सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदारांना मतदानादिवशी जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी बुधवारी (दि. २०) मतदानादिवशी महिला, युवा, दिव्यांग संकल्पना (थीम) वापरुन सामाजिक, ऐतिहासिक, भौगाेलिक वारशास अनुसरुन विशेष आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत विधानसभा निवडणूक स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी अर्चना वाघमळे यांनी सूचना दिल्या आहेत.

स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून विविध थीम वापरुन आदर्श मतदान केंद्र करण्यात येणार आहेत. ज्या मतदान केंद्रांवर सर्वात कमी मतदान झाले आहे अशा केंद्रांची या उपक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे. लाेकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्वीप कार्यक्रमातर्गत जनजागृती करण्यात येत आहे. अनेक उपक्रम, विविध थीम वापरुन मतदान जनजागृती होत आहे.

मतदानादिवशी मतदारांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवण्याबरोबर विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन मतदानाचा टक्का वाढवण्याच्या कामात हातभार लावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.

बांबू सजावट… जय किसना… सातारा टायगरही

बांबू सजावट, जय जवान (आर्मी), प्रतापगड (ऐतिहासिक वारसा प्रतिकृती), कातकरी (वारली वैभव), शिक्षण, जय किसना (मिलेट – तृणधान्ये) शेतकरीराजा, टायगर रिझर्व्ह (सातारा टायगर) व्याघ्रप्रकल्प, स्ट्रॉबेरी, हेरिटेज कास (नैसर्गिक वारसास्थळ), कोयना (जीवनदायिनी/ भाग्यरेषा), ग्रीन पोलिंग (पर्यावरण पूरक) या थीमचा वापर करुन विशेष मतदान केंद्र संकल्पना राबवावी, अशा सूचना अर्चना वाघमळे यांनी केल्या आहेत.