कराड प्रतिनिधी । पाटण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद उर्फ भानुप्रताप कदम यांच्या प्रचार सभेसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगा, साहित्याची रविवारी कराड विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानात असलेल्या पिशवी उघडून पाहण्यात आली. दरम्यान, नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साहित्याची देखील तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणी अधिकाऱ्यांकडे पाहता उद्धव ठाकरे यांनी शाब्बास अधिकाऱ्यांनो… शाब्बास…बॅगा तपासताय, मोदी, शहांची तपासली का? असा सवाल ठाकरे यांनी केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पाटण येथील मल्हारपेठमध्ये सभा पार पडली. या सभेसाठी ठाकरे सकाळी कराड येथील विमानतळावर आपल्या विमानाने उतरले. ठाकरेंचा सभासाठीचा दौरा नियोजित असल्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचं पथक विमानतळावर तळ ठोकून बसलं होता. दुपारी विमानाने उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं. त्यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या. तसेच विमानात जाऊन साहित्याची तपासणी केली. पिशव्यांची तपासणी करत असताना अधिकाऱ्यांना त्यात काळ्या रंगाचा गॉगल आढळून आला.
तपासणी सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या हातातील मोबाइलवरून सर्व घटनेचं व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच अधिकाऱ्यांना त्यांचे नाव व पद देखील विचारले. यावेळी कुणाकुणाच्या बॅगांची तपासणी केलीय? असा सवाल ठाकरेंनी विचारताच अधिकाऱ्यांनी आतापर्यंत गोव्याचरे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बँगची तपासणी केल्याचे सांगितले.
डॉ. प्रमोद सावंत, फडणवीसांच्या बॅगेतील साहित्याची तपासणी
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारासाठी शनिवारी (९ नोव्हेंबर) पहिल्यांदा कोल्हापूरात आले. महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शनघेऊन त्यांनी प्रचाराला सुरूवात केली. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार सभा घेतल्या. त्यानंतर बुधवारी (१३ नोव्हेंबर) ते कराडमध्ये दाखल झाले. कराड दक्षिणमधील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या डॉक्टरांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलं. बुधवारी मेळावा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ते पुढील दौऱ्यासाठी निघाले असताना विमानांची आणि विमानातील साहित्याची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बँगा आणि साहित्य तपासण्यात आलं. नेत्यांच्या दौऱ्यामुळं कराड विमानतळ सध्या चर्चेत आहे. तसंच याठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांचं पथकच तैनात करण्यात आलंय.