सातारा प्रतिनिधी । हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने सातारा जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाठार स्टेशन, सातारा बसस्थानकाची तपासणी केली. पाहणीवेळी सर्वेक्षण समितीमधील सदस्यांनी अधिकाऱ्यांना एसटीच्या सवलत योजनेची माहिती दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई विभागाच्या कामगार अधिकारी वृषाली डोंगरे, उपयंत्र अभियंता सचिन पवार यांनी शनिवारी फलटण, लोणंद, वाठार स्टेशन व सातारा बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी सातारा बसस्थानकाच्या समितीने शनिवारी सायंकाळी पाहणी केली. त्यावेळी समितीतील कामगार अधिकारी वृषाली डोंगरे, उपयंत्र अभियंता सचिन पवार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सातारा जिल्हाध्यक्ष जयदीप ठुसे यांच्यासह अन्य सदस्यांचे सातारा आगाराचे आगार व्यवस्थापक आर. एम. शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
समितीने सातारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष, आगार व्यवस्थापक कश, प्रवासी आरक्षण सेंटर, पुरुष व महिला स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांती कक्ष, कर्मचारी वाहन पार्किंग, कार्यशाळा, चौकशी खिडकी, मासिक पास खिडकीची , पाहणी करून तेथील कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तसेच विविध रजिस्टर व फाईलची पाडताळणी केली. कार्यशाळेत एस.टी. बसची स्वच्छता व्यवस्थित केली जाते का? नाही याचीही कटाक्षाने पाहणी केली. यावेळी एसटीच्या विविध सवलतींची माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही वृषाली डोंगरे व सचिन पवार यांनी दिल्या.