सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आज आगमन होत आहे. या पालखी सोहळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा येथील बाॅम्बशोधक, श्वान पथकाकडून पोलिस श्वानाच्या साह्याने लोणंदच्या निरा नदीवरील पुलाची तसेच मुख्य पालखीतळाची पाहणी करण्यात आली.
यावेळी सातारा जिल्ह्यातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस उपनिरीक्षक घाडगे, पोहवा वलेकर, घोरपडे, पोलीस नाईक जाधव, साळुंखे, सावंत यांनी श्वान रूद्रच्या साह्याने केलेल्या तपासणीत कोणत्याही ठिकाणी संशयास्पद काही आढळून आले नाही. या पथकाने तरडगाव, फलटण, बरड अशा संपूर्ण पालखी मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने हे पथक तपासणी पुर्ण केलेली.
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कोणतीही बेवारस वस्तू बॅग अथवा संशयित वस्तू मिळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष सातारा यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आज आगमन होत असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजीही घेतली जात आहे.