कराड प्रतिनिधी | कराड येथील रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार असून प्रवाशांच्या आकर्षणाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जाणार आहेत. या ठिकाणी अनेक सोयी सुविधा उभारण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी नुकतीच कराड रेल्वे स्थानकास भेट देत पाहणी केली. यावेळी कराडच्या रेल्वे स्थानकावर कशा प्रकारच्या सुविधा असाव्यात? तसेच इतर कोणत्या बाबी असाव्यात, प्रवाशांना कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याविषयी दुबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. दरम्यान, कराडचे रेल्वेस्थानकावर ऐतिहासिक व पर्यटन स्थळे साकारली जाणार आहेत.
यावेळी इंदू दुबे यांचे कराड रेल्वे स्थानकावर आगमन होताच गोपाल तिवारी तसेच से कराडचे स्टेशन प्रबंधक एन. जी. अलेक्झांडर यांनी इंदू दुबे यांचे स्वागत केले. कराड येथील क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी, कराडचे स्टेशन प्रबंधक एन. जी. अलेक्झांडर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान, दुबे यांनी अधिकाऱ्यांसह कराड रेल्वे स्थानकातीळ विविध ठिकाणांची पाहणी केली. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी इंदू दुबे यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या तसेच पुढे त्या म्हणाल्या की, कराडला ऐतिहासिक वारसा आहे. याचबरोबर कराड शहर व परिसरात विविध पर्यटन स्थळे आहेत.
हे चित्ररूपात रेल्वे स्थानकावर साकारल्यास कराडचे पर्यटन अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी कराड येथील गोपाल तिवारी तसेच स्टेशन प्रबंधक अलेक्झांडर यांनी कराडच्या रेल्वे स्थानकाविषयी इंदू दुबे यांना माहिती दिली. यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कराडच्या रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार : गोपाल तिवारी
कराड येथील रेल्वे स्थानकास विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे नुकतीच भेट दिली आहे. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने अनेक सुविधा उभारण्याचे काम सुरु आहे. या पूर्वी या ठिकाणी रेल्वे स्थानकावर प्राणी, पक्षी यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. आता त्यानंतर कराड व परिसरातील पर्यटनस्थळांची चित्रे या याठिकाणी काढण्यात येणार असल्याचे क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.