सातारा प्रतिनिधी | हातलोट व कासरुड या दोन्ही गावाना जोडणाऱ्या पूलाचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्या कारणाने या कामाचा आढावा घेण्यासाठी महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मंडळ मुंबई संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे व सरचिटणीस गोविंद मोरे यांनी पूल परिसरास नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पूलाची पाहणी करत तांत्रिक बाबी देखील तपासल्या.
यावेळी महाबळेश्वरचे विकासक डी. एल. शिंदे, पदाधिकारी बबन मालुसरे, मारुती जाधव, सुनील जाधव, विजय घाडगे आणि शिवाजी मोरे उपस्थित होते. दरम्यान, सर्व परिस्थितीचे निरीक्षण केल्यावर व कंत्राटदार सुरज पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देशपांडे यांच्याशी चर्चा झाली.
सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे. पण हे काम जलदगतीने केल्यास त्याचा कामाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. पुलाच्या गर्डरचे काँक्रीटीकरण केल्यानंतर किमान २८ दिवस त्यावर स्लॅबचे काँक्रीटीकरण करू नये. कारण एका स्लॅबचे अंदाजे वजन सव्वाशे टन आहे. त्यामुळे गर्डरच्या स्थिरतेला आणि मजबुतीला धोका निर्माण होण्याची शक्यता उद्भवते, म्हणून काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.
कंत्राटदारास काम पूर्ण होण्याची तारीख जानेवारी २०२५ असून देखील जवळजवळ ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलावरील प्लेट टाकून २-३ दिवसात माणसांची तात्पुरती वाहतूक सुरू होईल तसेच पुलापलीकडे असणाऱ्या गाड्या अलीकडे आणण्यासाठी नदीवर भराव टाकून तात्पुरती व्यवस्था केली असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली.