कराड प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागामार्फत तारगाव- मसूर-शिरवडे दरम्यान दुहेरीकरणाचे युध्दपातळीवर सुरू आहे. या कामाची पाहणी रेल्वे सेफ्टी आयुक्त मनोज आरोरा यांनी नुकतीच केली. तसेच यावेळी शिरवडे ते तारगावदरम्यान लोहमार्गावर वेगाची चाचणीही घेण्यात आली. दरम्यान, पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या एकूण २७९ कि.मी.पैकी २१३ कि.मी.चे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी पुणे विभागातील तारगाव-मसूर-शिरवडेदरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाची पाहणी केली. हा परिसर १७.८५ किलोमीटर लांबीचा आहे. यामध्ये तारगाव-मसूर व मसूर-शिरवडे असे दोन भाग आहेत. मनोज आरोरा यांनी शनिवारी सकाळी १ वाजल्यापासून दुहेरीकरण कामाच्या पाहणीस सुरुवात केली. ६.३० वाजेपर्यंत त्यांनी ट्रॉलीने य परिसराची पाहणी केली. त्यानंतर शिरवडेरे तारगाव येथे वेगाची चाचणी घेतली. चाचणी दरम्यान जास्तीत जास्त १३१ कि.मी. प्रतितास वेग गाठला गेला.
आयुक्त मनोज आरोरा यांनी या विभागात ताशी ९० कि.मी. वेगाने गाड्या चालवण्यास मान्यता दिली असून ती हळूहळू ११० किमी प्रतितास करण्यात येईल. तसेच तारगाव आणि मसूर येथे २ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यात आले.पाहणीवेळी मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश पांडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे, मुख्य इंजीनियर (बांधकाम) अधिकारी व कर्मचारी होते.