कराड प्रतिनिधी | फक्त विरोधी नेत्यांच्याच साहित्याची तपासणी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यानंतर निवडणूक यंत्रणेनं सत्ताधाऱ्यांच्याही साहित्याची तपासणी सुरू केली आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा, साहित्याची शुक्रवारी कराड विमानतळावर तपासणी करण्यात आली.
विमानात असलेल्या पिशवीतील डबाही उघडून पाहण्यात आला. त्या डब्यात चकल्या होत्या. दरम्यान, कालच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साहित्याची तसंच त्यांच्यासाठी आलेल्या मोकळ्या विमानांची तपासणी करण्यात आली होती.
पिशवीतील डबाही उघडून पाहिला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कराड दौरा नियोजित होता. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचं पथक विमानतळावर तळ ठोकून होत. दुपारी विमानाने फडणवीसांचं आगमन झालं. त्यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या. तसेच विमानात जाऊन साहित्याची तपासणी केली. त्यात एका पिशवीत गाठ मारलेली प्लॅस्टिकची पिशवी होती. त्या पिशवी डबा होता. तो डबा देखील उघडून पाहिला.
सलग दुसऱ्या दिवशी साहित्याची तपासणी
कराड दौऱ्यावर आल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विमानांची आणि विमानातील साहित्याची काल (गुरुवारी) तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बँगा आणि साहित्य तपासण्यात आलं. नेत्यांच्या दौऱ्यामुळं कराड विमानतळ सध्या चर्चेत आहे. तसंच याठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांचं पथकच तैनात करण्यात आलंय.