सातारा प्रतिनिधी | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात येत असून यावर्षी माऊलींच्या सोहळ्यातील वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून पालखी सोहळ्यातील स्वच्छता सुविधांची माहिती आता क्यू आर कोडवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना स्वच्छतेच्या सुविधा जलद उपलब्ध होणार आहेत. यावर्षीही पालखी सोहळ्यात १८०० फिरती शौचालये उपलब्ध असणार आहेत.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने- भोसले यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गावरील सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली. वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याबाबत प्रशासनाने नियोजन केले असून त्यादृष्टीने विविध विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.
पालखी सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक सहभागी होत असल्याने सोहळ्याचे चांगल्या पध्दतीने नियोजन करण्यात येत आहे. सोहळ्यात स्वच्छता ठेवण्याबरोबर स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे महत्त्व असते. त्यानुसार १४६ पुरुष स्नानगृहे, १६७ महिला स्नानगृहे, महिला व पुरुषांसाठी ७२ तात्पुरत्या मुताऱ्या असणार आहेत.
लाेणंद नगरपंचायत हद्दीत १३ ठिकाणी १८०० शौचालये, तरडगाव येथे १८ ठिकाणी १८०० शौचालये, फलटण येथे १६ ठिकाणी १८०० शौचालये, बरड येथे १९ ठिकाणी १८०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सार्वजनिक शौचालय, सुलभ सार्वजनिक शौचालय, मंगल कार्यालय शौचालय, हॉटेल शौचालय, वैयक्तिक शौचालय, आश्रमशाळा अशा १० हजार १०७ शौचालयाची व्यवस्था असणार आहे. पाडेगाव, तरडगाव येथे कायमस्वरुपी सुलभ शौचालय उभारणी करण्यात आल्याची माहिती प्रज्ञा माने- भोसले यांनी दिली.
एका क्लिकवर होणार माहिती उपलब्ध…
माउलींच्या सोहळ्यात दरवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत भर पडत असून वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना प्रशासनाची दमछाक होत आहे. वारकऱ्यांना उपलब्ध सुविधांची माहिती व्हावी यासाठी क्यू आर कोडची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळणार आहे. प्रत्येक सुविधेवर क्लिक करताच त्याचे गुगल लाेकेशन मॅप पाहायला मिळणार आहे.