खराब हवामानाचा तुरीलाही बसलाय फटका..! माणमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील दुष्काळी अशा माण तालुक्यातील वरकुटे-मलवडीसह बनगरवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. अशा बोचऱ्या थंडीत सकाळची धुके, कधी दिवसभर कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. तुरीच्या भरात आलेल्या शेंगा पोखरणाऱ्या अळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

यावर्षी पाऊस वेळच्या वेळी पडल्याने माण तालुक्यात बाजरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. मात्र, बाजरीच्या पिकावरही कणीस भरात येताना वेगवेगळ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजरीचे उत्पादन घटले; मात्र, पुन्हा एकदा अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे बनगरवाडी वरकुटे-मलवडी परिसरात तुरीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. बहरलेले पीक चांगले उत्पादन देणार, अशी आशा असलेले तुरीचे पीकही वाया जाणार की काय? की औषध फवारणीचा परिणाम होईपर्यंत कमाल उत्पादनात घट होईल? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडल्याने

माण पूर्व भागातील तूर उत्पादक शेतकरी काळजीत पडला आहे. यंदा वेळेवर पाऊस झाला असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे बाजरी, मूग आदी पिकांच्या उत्पादनात घट आली. आता तूर पीकही शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे धोक्यात आले आहे. या अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

शेतकरी फवारणीविषयी एकमेकांना विचारणा करीत आहेत. खरिपात बाजरी, मूग तसेच मका पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. आता तुरीच्या पिकावर शेतकऱ्यांची आर्थिक मदार आहे. यातून केलेला खर्च निघेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे. परंतु अखेरच्या टप्प्यात महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही यश येत नसल्याचे चित्र आहे. खरिपात झालेले नुकसान पाहता, तूर पिकाची जोपासना करण्यासाठी शेतकरी प्रयत्नात आहेत. मात्र, बदलत्या वातावरणामुळे ही पिके सध्या सलाईनवर असल्याचे चित्र आहे.