कराड प्रतिनिधी । दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Karad South Legislative Constituent Assembly) हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी हा बालेकिल्ला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ढासळणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगू लागली आहे. निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा होण्यापूर्वीच महाविकास आघाडीत फूट झाल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटातील सातारा जिल्ह्याचे समन्वयक व कराडचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर (कॅप्टन) (Indrajit Gujjar) यांचे ‘मिशन विधानसभा’ असे फ्लेक्स कराड लावून विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे एकप्रकारे संकेत दिले आहेत. त्यांनी फ्लेक्सआडून घेतलेल्या भूमिकेमुळे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची डोकेदुखी वाढवली आहे. अशात भाजपकडून डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी जोरदार तयारी केली असल्याने असल्याने पृथ्वीराज बाबांना हि निवडणूक जड जाणार हे नक्की!
कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत होणारी लढत ही प्रतिष्ठेची बनली असून, ‘बिग फाइट’मुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात राजकीय खलबते देखील सुरू झाली आहेत. कराड दक्षिण मतदार संघाकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या ठिकाणी यावेळेस ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ रंगणार आहे.
मागील विधानसभा निवडणूक कराड दक्षिणेत तिरंगी झाली होती. यावेळेस ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने लावलेल्या बॅनरबाजीमुळे तिरंगी होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्यातच लढत होणार असल्याचे सांगितले जात असले तरी या दोघांच्यात तिसरा (कॅप्टन) देखील आल्यास याचा फटका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नक्की बसू शकतो. कारण कराड शहर व तालुक्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांची इंद्रजित गुजर यांच्या पाठीमागे ताकद आहे.
एकंदरीत कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कोण ‘फाइट’ मारणार आणि कोण वातावरण ‘टाइट’ करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांनी सलग सात वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले. आता चव्हाण हे तिसऱ्यांदा सर्व ताकदीनिशी रिंगणात उतरताहेत. मात्र, पाच वर्षात केलेल्या कमी कामामुळे व पालिकेच्या नगरसेवकांनी सोडलेल्या साथीमुळे पृथ्वीराजबाबांना हि निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा सध्या मतदार संघात सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण मतदारसंघातील एकंदर परिस्थिती पाहता पृथ्वीराज चव्हाण डेंजर झोनमध्ये असल्याचं बोललं जातंय.
वर्षभरात पृथ्वीराजबाबांना बसले दोन मोठे धक्के
पृथ्वीराज चव्हाण यांना पहिला धक्का बसला तो म्हणजे भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसला जून महिन्यात खिंडार पाडले. काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस, मलकापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा बांधकाम सभापती राजेंद्र यादव आबा यांच्यासह तीन विद्यमान नगरसेवकानी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि दूसरा धक्का नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मलकापुरातून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना तब्बल तीन हजारांचे मिळालेले मताधिक्य आणि कराड दक्षिणमध्ये महाविकास आघाडीची पिछेहाट झाली. यामुळे पृथ्वीराज चव्हाण समर्थक अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.
यापूर्वी दोन शिवसेनेचे नेत्यांनी लढवली होती विधानसभेची निवडणूक
बांधकाम व्यवसायिक, शिवसेना नेते, घोगाव, ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था आणि मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव जगन्नाथ भावके यांनी १९९५ ला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तेथून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. मात्र, त्यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत शिक्षणतज्ज्ञ आणि बिहारचे राज्यपाल डी.वाय.पाटील यांचे पुत्र अजिंक्य पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवून याठिकाणी आपले नशीब आजमावले होते.