सातारा प्रतिनिधी । आजच्या जगात संगणक, लॅपटॉपसह मोबाईल फोनचा वापर करणे जास्त प्रमाणात वाढलेला आहे. असं एकही क्षेत्र सापडणार नाही की जिथं संगणक किंवा मोबाईल नजरेस पडणार नाही. मात्र, संगणक व लॅपटॉपचा वापर कधी व किती करावा, याची देखील मर्यादा आहे. याचा अतिवापर डोळे, पाठ, मान व बोटांच्या आजारासह मानसिक आजारांना निमंत्रण देऊ शकतो. या उपकरणांवर काम करताना थोडी काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तत्ज्ञांकडून देखील दिला जात आहे.
संगणक, लॅपटॉप, टॅब, मोबाइल या जीवनावश्यक गरजा बनल्या आहेत. खासगी कंपन्या, बँका, पतसंस्था तसेच शासकीय कार्यालयांचे काम संगणकाशिवाय होऊच शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. संगणकावर काम करताना आपल्याला वेळेचे भान राहात नाही. अगदी आठ ते दहा तास आपण संगणकाचा वापर करतो. त्यामुळे कळत-नकळत आपल्याला कितीतरी शारीरिक व्याधी जडतात. पुढे जाऊन या व्याधी गंभीर आजाराचे कारणही बनतात. संगणक, लॅपटॉप, मोबाइल अशा वस्तूंचा वापर मर्यादित ठेवणे गरजेचे बनले आहे.
संगणक, लॅपटॉप अतिवापराचे धोके काय?
पाठीचे आजार : एकाच जागेवर बराचवेळ बसून काम केल्यास पाठ व कंबरदुखी उद्भवते. पुढे जाऊन पाठदुखीची समस्या अत्यंत गंभीर बनते. चालताना, पळताना पाठीत कळा येऊ शकतात.
मानेचे आजार : संगणकावर काम करताना आपले डोळे आणि हाताची बोटे यांचीच क्रिया सुरू असते. यावेळी आपल्या मानेची कोणतीही हालचाल होत नाही. त्यामुळे मानेचे स्नायू जखडले जाऊ शकतात.
डोळ्यांचे आजार : संगणकाच्या काचेकडे सातत्याने पाहिल्यास डोळ्यांची उघडझाप कमी होते. डोळ्यातील ओलावा कमी झाल्यास डोळे जळजळणे, चुरचुरणे असे प्रकार होतात.
काय काळजी घ्याल…
- संगणकावर काम करताना आपण व्यवस्थित बसलो आहोत की नाही याची काळजी घ्यावी. तासाभरानंतर थोडी विश्रांती घ्यावी. शारीरिक हालचाली कराव्या. शक्य असेल तर डोळे थंड पाण्याने धुवावेत.
- आपले डोळे व संगणक यात किमान दीड ते दोन फुटाचे अंतर असावे. पाठीला बाक येईल अशा स्थितीत बसून काम करणे टाळावे लहान मुलांना अशा उपकरणांपासून शक्यतो दूर ठेवावे
- संगणक, लॅपटॉप हाताळताना आपली मान व पाठीवर ताण येत असतो. त्यामुळे व्यायामाला प्राधान्य द्या. योगासन शरीराला लाभदायी ठरू शकते.