सातारा प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले आहे. कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भाने प्रशिक्षण दिले जात असून गर्दी टाळण्यासाठी १४७ मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे मतदारांना मतदान करताना अडचणी येणार नाहीत. मतदान केंद्र संख्या वाढल्याने संबंधित ठिकाणी गर्दी कमी असेल, परिणामी मतदारांना निवांतपणे आपला मतदानाचा हक्क बजावू शकता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या अनुषंगाने १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा दुसरा कार्यक्रम राबविला. जिल्हा प्रशासनाकडून पुनरीक्षणपूर्व उपक्रम राबविण्यात आल्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर आलेल्या दावे व हरकती निकाली काढल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यानुसार जिल्ह्यात पुरुष मतदार १३,२९,०७३, स्त्री मतदार १२९५०१७ व तृतीयपंथी मतदार ११३ असे २६ लाख २४ हजार २०३ मतदार आहेत.
जिल्ह्यात नवीन १४७ मतदान केंद्रे
लोकसभेला ३०१९ मतदान केंदे होती. मतदारांना सुविधा निर्माण व्हावी यासाठी १४७ मतदान केंद्रे वाढविण्यात आली आहेत. मतदारांना सुविधा निर्माण व्हावी यासाठी नवीन मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडूनही आढावा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ज्या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे, त्याठिकाणची कारणे शोधून टक्का वाढवण्याच्या सूचना दिल्याने जिल्हा प्रशासनाने त्या दृष्टीने काम सुरू केले आहे
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
फलटण : १७२२०८ पुरुष, १६५६९७ स्त्री, १४ तृतीयपंथीय,
वाई : १७२८७६ पुरुष, १७२४३८ स्त्री, ७ तृतीयपंथीय
कोरेगाव : १६१७२० पुरुष, १५७०६८ स्त्री, ३ तृतीयपंथीय
माण-खटाव : १८२६२१ पुरुष, १७४१८९ स्त्री, १० तृतीयपंथीय
कराड उत्तर : १५४६२८ पुरुष, १४९८३१ स्त्री, ७ तृतीयपंथीय
कराड दक्षिण : १५८८३७ पुरुष, १५३८८८ स्त्री, ३२ तृतीयपंथीय
पाटण : १५५७२० पुरुष, १५१८५६ स्त्री, ३ तृतीयपंथीय
सातारा : १७०४६३ पुरुष, १७००५० स्त्री, ३७ तृतीयपंथीय
एकूण : १३२९०७३ पुरुष, १२९५०१७ स्त्री, ११३ तृतीयपंथीय