सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर विभागाच्या वतीने बुधवारी छापा टाकण्यात आला. संजीवराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. आयकर विभागाच्या छाप्यामुळं सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या छापेमारीमागे नेमकं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
फलटणचं नाईक निंबाळकर राजघराणं हे शरद पवार यांच्या नेहमीच पाठीशी राहिलं होतं. परंतु, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांसोबत गेले. मात्र, त्यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि राजे गट बऱ्यापैकी शरद पवारांच्याच बाजूला राहिला. विधानसभा निवडणुकीत रामराजेंनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार टाळून शांत राहाणे पसंत केले होते. तर संजीवराजेंनी शरद पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज असलेल्या खा. उदयनराजे भोसले यांचं मुख्य राजघराणं आहे. त्यानंतर फलटण, पाटण ही सुध्दा घराणी सातारच्या राजघराण्याशी संबंधित आहेत. आतापर्यंत या तिन्ही राजघराण्यातील कोणाच्याही संदर्भात आयकर अथवा ईडीसारखी कारवाई झालेली नव्हती. फलटणमध्ये झालेली कारवाई ही पहिली कारवाई आहे.
फलटणच्या राजकारणात रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांमध्ये गेली काही वर्षे राजकीय वाद धुमसत आहे. त्याचे पडसाद अनेक दिवसांपासून फलटणमध्ये पाहायला मिळत होते. लोकसभा निवडणुकीत रामराजेंच्या गटाने रणजितसिंह निंबाळकरांना उघड विरोध केला होता. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळं रणजितसिंह निंबाळकर हे चिडून होते. विधानसभा निवडणुकीत आपल्या समर्थकाला निवडून आणून रणजितसिंहांनी स्वतःच्या पराभवाचा वचपा काढला.