सातारा प्रतिनिधी । राज्यातील जेष्ठ नागरिकांना उतारवयात देवदर्शन करता यावं, कोणतीही आर्थिक अडचण पडू नये यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजना जाहीर केली होती. या योजनेतील पात्र नागरिकांचा प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत सातारा जिल्ह्यातील दोन तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री. काळेश्वर ऊर्फ काळूबाई मंदिर व माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
राज्यातील विविध धर्मातील व पंथातील ज्येष्ठांना 66 तीर्थस्थळांचे मोफत दर्शन या योजनेतून घडणार आहे. राज्यातील प्रामुख्याने गोरगरीब भाविकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशासह सातारा जिल्ह्यात विविध धर्म व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संतांच्या विचारांचा प्रसार हा महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून झाला. एक पावनभूमी म्हणूनही महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. सातारा जिल्ह्यात वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य, भक्ती मार्गाने करत असतात.
आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडत असतानाही आपल्या देवदेवतांचे, भगवंताचे नामस्मरण, चिंतन करत आयुष्य जगत असतात. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा कोणी सोबत नसल्याने आणि परेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन:शांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची किंवा दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे.
30 हजार इतक्या खर्चाची कमाल मर्यादा आहे. संबंधित लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, त्याचे वय 60 हून अधिक असावे. तसेच लाभार्थीचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर तसेच श्री. काळेश्वरी ऊर्फ काळुबाई मंदिराचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील विविध सुप्रसिद्ध 64 तीर्थक्षेत्रांनाही भाविकांना भेटी देता येणार आहेत.