कराड प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात आला आहे. ‘शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी पैशांची गरज नसते तर सरकारच्या मानसिकतेची गरज असते. अशी समिती स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले असल्याचे बळीराजा संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
समितीच्या शेतकरी प्रतिनिधीपदी समावेश झाल्यानंतर पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक अभ्यास समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिल्याबद्दल मी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ मे २०२३ रोजी एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चाही करण्यात आली. तसेच यावर तात्काळ उपाययोजना सुचविण्याकरीता अभ्यास समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार दि. १ जून २०२३ च्या शासन निर्णयान्वये अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे कृषी आयुक्तांनी दि. २६ जून २०२३ रोजी पाठवले.
या पत्रात अभ्यास समितीमध्ये तीन शेतकरी प्रतिनिधींचा समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामध्ये १) विनायकराव पाटील, २) सिकंदर शहा आणि ३) पंजाबराव पाटील यांचा शेतकरी प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठी पैशांची गरज नसते तर सरकारच्या मानसिकतेची गरज असते. अशी समिती स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले असल्याचे पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.