कराड शहरात गल्लोगल्ली धडकी भरवणारी गुरगुर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गल्लीबोळं जास्त आहेत पण त्याहूनही जास्त आहे त्या गल्लीबोळात फिरणाऱ्या मोकाट श्वानांची संख्या़. येथे तब्बल तीन हजार मोकाट श्वान वावरत असल्याचा दावा ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर पालिका आणि ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीनवेळा नसबंदी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. सध्या कराड शहरात श्वानांची संख्या कमी झाली असली तर रात्रीच्यावेळी काही मोकाट श्वान शहरातील पेठांमधील रस्त्यांवर वावरत आहेत. त्यांच्याकडून रस्त्यावरून चालत निघालेल्या नागरिकांवर व लहान मुलांवर हल्ले देखील केले जात आहेत. या गोष्टींकडे कराड पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कराड पालिका व मंडई परिसरात गत आठवड्यात एका गल्लीत मोकाट श्वानांच्या टोळक्यांनी घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी श्वानांच्या टोळक्याला परतवून लावले. अशा प्रकारे अनेक दिवसांपासून काही भागात मोकाट श्वानांचा धुमाकूळ सुरू आहे़. रात्रीच्यावेळी बसस्थानक परिसर, कृष्णा नाका, प्रीतिसंगम बाग परिसर दत्त चौक भेदा चौक यासह अन्य ठिकाणी श्वानांची दहशत असते. रात्री दहानंतर काही ठिकाणी जाणेच नागरिकांना मुश्कील झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणीही ते पाठलाग करून प्रवाशांसह नागरिकांनाही अक्षरश सळो की पळो करून सोडतात.

सध्या शहरातील कोणत्याही रस्त्यावर गेले तरी मोकाट श्वान आढळून येतात़ रात्रीच्यावेळेस मोकाट श्वान कचरा डेपोच्या परिसरात तसेच चौकाचौकामध्ये आढळून येतात. त्याठिकाणी एखादा नागरिक गेल्यास त्याच्यावर हल्लाही होतो. त्यामुळे अनेकजण रात्रीच्यावेळी कचरा टाकण्यासाठी बाहेर फिरकतही नाहीत. रस्त्याच्या दुभाजकांमध्येही रात्री श्वानांचा वावर असतो. दरम्यान, कराड शहरात एका गल्लीत खेळत असलेल्या खेळत असलेल्या लहान मुलांच्यावर श्वानांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुन्हा एकदा श्वानांच्या हल्ल्याचा प्रश्न समोर आला आहे.

नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी : अमोल शिंदे

कराड पालिका आणि ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीन वर्षांपूर्वी कराड शहरातील पाकात श्वानाची नसबंदी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर एक वर्षात तीनवेळा नसबंदीची मोहीम पालिकेकडून राबविण्यात आली. आता कराड शहराबाहेरील असलेल्या भागातून श्वान येत आहेत. नागरिकांनी श्वानांना खाण्यास द्यावे, त्याला राग येईल असे वर्तन करू नये, अशी प्रतिक्रिया ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’चे सदस्य अमोल शिंदे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

पालिकेने मोकाट श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा : सुधाकर गायकवाड

कराड शहरात मोकाट श्वानांकडून हल्ला होण्याआधीच सावध पवित्रा घ्यायला हवा. अशा प्रकारच्या घटना नूतन मराठी शाळा ते अशोक ऑटोमोबाईल मंगळवार पेठ या परिसरामध्ये घडत आहेत. या परिसरामध्ये मोकाट श्वानांची संख्या जास्त आढळत आहे. कराड येथील रुक्मिणीनगरमध्ये एका बालिकेवर श्वानाने केलेल्या हल्ल्याची घटना आजही कराडकर विसरलेले नाहीत. त्यामुले भविष्यात अशा घटना घडू नये याची कराड पालिका प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया कराड येथील मंगळवार पेठेतील नागरिक सुधाकर गायकवाड यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

२००३ साली घडली होती रुक्मिणीनगरमध्ये बालिकेवर श्वानाच्या हल्ल्याची घटना

कराड शहरातील रुक्मिणीनगरमध्ये एका बालिकेवर श्वानाच्या हल्ल्याची घटना २००३ साली घडली होती. त्यावेळी श्वानांची नसबंदी करण्याबाबत ‘अ‍ॅनिमल प्रोटेक्शन’च्यावतीने पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, पालिकेकडून त्या पत्रव्यवहाराला कसलाच प्रतिसाद मिळाला नाही़. पालिकेने मोकाट श्वानांचा प्रश्न त्यावेळी गांभीर्याने घेतला नाही़. सुमारे आठ वर्षांपूर्वी नसबंदीची ही मोहीम राबविण्यात आली़. ‘अ‍ॅनिमल प्रोटेक्शन’च्या सदस्यांनी शहरातील गल्लीबोळांत फिरून श्वान पकडले व शस्त्रक्रिया केली़. त्यावेळी सुमारे दीड हजार श्वानांवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर गतवर्षीही अशीच मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी सुमारे १ हजार ७०० श्वानांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मोकाट श्वान का पिसाळतात ?

१) वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाचा सर्वात जास्त परिणाम श्वानांवर होत असतो़ त्यामुळे वातावरण बदलल्यास श्वान पिसाळण्याची शक्यता जास्त असते़.
२) श्वानांना वेळेत अन्न न मिळाल्यास अथवा त्यांची उपासमार झाल्यासही त्यांच्या वागण्यात फरक पडतो़.
३) सर्वसाधारणपणे घाण आणि दलदल असलेल्या ठिकाणी श्वानांचा वावर जास्त असतो़ गढूळ पाणी पिल्यासही ते पिसाळतात़.
४) रस्त्याकडेला पडलेले मांस श्वान खातात़ एखाद्या श्वानाला मांसाची चटक लागलीच तर ते पिसाळण्याची शक्यता जास्त असते़.
५) उपाशी असताना श्वानाला वारंवार हुसकावले़ त्याला दगड मारले तर तो तापट बनण्याची व हल्ला करण्याची शक्यता असते़.

श्वानांना ‘व्ही’ आकाराचे ‘टॅगिंग’

मोकाट श्वान पकडून त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येते. मात्र, शस्त्रक्रिया झालेली श्वान ओळखून येण्यासाठी त्यांच्या कानाला ‘व्ही’ आकाराचे ‘टॅगिंग’ केले जाते. तीन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करून अशा प्रकारचे ‘टॅगिंग’ करण्यात आले होते.

श्वान पकडताना खबरदारी…

मोकाट श्वानांचा शोध घेऊन ती पकडणे सहज सोपे नसते. ज्यावेळी अशी मोहीम राबविली जाते, त्यावेळी अ‍ॅनिमल वेलफेअरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहर परिसर पिंजून काढावा लागतो. मोकाट श्वान दिसताच त्यांना इजा न होता पकडावे लागते. हे काम करताना हल्ला होण्याची दाट शक्यता असते. तसेच श्वानाला दुखापत होऊ शकते, त्यामुळे खबरदारी घ्यावी लागते.

शस्त्रक्रियेनंतर ‘मल्टी व्हिटॅमीन’चा डोस

कराडात तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी मोकाट श्वान पकडण्याची मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी अ‍ॅनिमल प्रोटेक्शनच्या अधिकारी व कर्मचाºयांनी सुमारे १ हजार ७०० श्वान पकडले. त्यांची शस्त्रक्रिया केली. वास्तविक, अनेकवेळा श्वानांना वेळेत अन्न मिळत नाही. त्यामुळे ती पिसाळण्याची शक्यता दाट असते. ही परिस्थिती ओळखून त्यावेळी अ‍ॅनिमल प्रोटेक्शनने पकडलेल्या श्वानांना ‘अँटी रेबीज’ची लस व ‘मल्टी व्हिटॅमीन’चा डोस दिला होता.