कराड प्रतिनिधी | पावसामुळे कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे हद्दीत असलेल्या रेल्वे पुलाच्या अंडरपास बोगद्यात पाणी साचल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना चिखलाचा राडारोडा झाला आहे. त्यातच सकाळी पुलाच्या तोंडावरच ट्रक रुतल्याने नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन ग्रामस्थांचा रस्ता सहा तास बंद झाल्याने वाहनांची ये- जा पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांना चिखलातून दोन किलोमीटर पायपीट करावी लागली.
नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन येथील लोकांना रेल्वे पुलाखालून गावात जावे लागते. पावसामुळे सध्या पुलाखाली चिखलाचा राडारोडा झाला आहे. दरम्यान, एक मालवाहक ट्रक सकाळी याच पुलाच्या तोंडावरच चिखलात रुतला. यामुळे पुलाखालून होणारी वाहतूक बंद झाली. जवळपास सहा तास वाहतूक बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. दर वर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून, ठेकेदारानेही हात वर केले आहेत.
ट्रक अडकलेल्या पुलाच्या ठिकाणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावरील क्रेन, पोकलेन देण्यास ठेकेदाराने नकार दिल्याने ट्रक बाजूला करण्यासाठी वेळ लागला. या रस्त्याचा प्रश्न रेल्वे प्रशासनाने कायमचा सोडवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने दिली आहेत. रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही तर नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे स्टेशन येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.