सातारा प्रतिनिधी । शेअर मार्केटच्या आमिषाने तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सातारा शहरात उघड झाला आहे. ही घटना दि. 30 सप्टेंबर ते दि. 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली असून संशयितांनी तक्रारदारांना फोन करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले आणि दुप्पट नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. संशयित राजीव जैन आणि अवंतिका देव यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांना एक व्हॉट्सअप ग्रुपवर जोडून त्यांना 300 टक्के पर्यंत नफा मिळत असल्याची माहिती देत संशयितांनी तक्रारदारांना फोन करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. संशयितांनी वेळोवेळी फोन करून पैसे गुंतवण्यास सांगितले, ज्यामुळे तक्रारदारांनी वेळोवेळी पैसे गुंतवले.
पैशांचा नफा झाल्याचे दिसल्यानंतर, संशयितांनी पैसे काढण्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे सांगून आणखी पैसे भरण्यास सांगितले. अनेकदा हा प्रकार होऊनही परतावा मिळत नसल्याने तक्रारदारांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.