सातारा जिल्हा पत्रकार भवनाचा बुधवारी स्वप्नपूर्ती सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेली अनेक वर्षे पाहिलेल्या एका स्वप्नाची पूर्तता झाली आहे. या स्वप्नपूर्तीचा दिमाखदार सोहळा बुधवारी (दि. 14) सातार्‍यातील साईबाबा मंदिराजवळ व हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर होत आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार भवन समितीने साकारलेल्या ‘सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे’ उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.

शंभर वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात पत्रकारांचे हक्काचे सातारा जिल्हा पत्रकार भवन व्हावे, अशी इच्छा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराच्या मनात होती. मात्र, सातारा जिल्हा पत्रकार संघाने अनेक समस्यांवर मात करत अखेर सातारा जिल्हा पत्रकार भवन साकारले. गोडोली येथील साईबाबा मंदिरापासून जवळ किल्ले अजिंक्यतारा रस्त्याला हे ‘सातारा जिल्हा पत्रकार भवन’ व साहित्य सदन साकारले असून बुधवारी सकाळी 11 वाजता त्याचे उद्घाटन होत आहे. त्यानंतर हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनजवळील सभागृहात मुख्य स्वप्नपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे.

सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अराजकीय करण्याचा निर्णय घेण्यात आला. खा. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आहेत. सातारा जिल्हा पत्रकार भवन त्यांनीच दिले. त्यामुळे फक्त त्यांच्या अध्यक्षतेखाली हा अराजकीय कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पत्रकारांच्या हितासाठी योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार व मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्याच हस्ते उद्घाटन व्हावे, असे ठरवून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या स्वप्नपूर्ती सोहळ्याला खा. उदयनराजे भोसले, एस. एम. देशमुख या मान्यवरांसह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, टी. व्ही. जर्नालिस्ट असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष विनोद जगदाळे, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत.

सातारा जिल्हा पत्रकार भवन साकारण्यासाठी निर्णायक योगदान देणारे खा. उदयनराजे भोसले, पत्रकारांच्या हिताचा पत्रकार संरक्षण कायदा संमत करुन घेणारे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. डी. जी. बनकर, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, भवनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणारे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा या सोहळ्यात सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे.

साताऱ्यातील गोडोली येथील साईबाबा मंदिरालगत सातारा जिल्हा पत्रकार भवन साकारले आहे. चार मजली असलेल्या या इमारतीला ‘सातारा जिल्हा पत्रकार भवन’ व ‘साहित्य सदन’ असे नाव देण्यात आले आहे. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर पत्रकारांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याखालच्या मजल्यावर पत्रकारांचे कार्यक्रम व पत्रकार परिषदा यासाठी सभागृह आहे. त्याखालील मजल्यावर सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय व तळमजल्यावर साहित्य परिषदेच्या उपक्रमांसाठी सभागृह आहे.