सातारा प्रतिनिधी । सातारा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयाचे नवीन इमारत बांधकाम, सायबर पोलीस ठाणे इमारतीचे नूतनीकरण व पोलीस ऑफिसर क्लबच्या इमारतीचे नुतनीकरणाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते काल झाले. यावेळी “पोलीस दल अत्याधुनिकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधी हा पोलीस विभागाला देण्याबबातचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे पोलीस विभागाला वाहनापासून इतर यंत्रणा अत्याधुनिक करण्यास मोठी मदत झाली आहे. यापुढही सातारा पोलीस विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना पालकमंत्री म्हणून नेहमीच सहकार्य राहील,” अशी ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपविभागीय पोलीस अधीकारी (गृह) अतुल सबणीस, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, जयराज देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, पोलीस विभागाने सायबर सेल अत्याधुनिक केला आहे. विविध समाज माध्यमांद्वारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा बसेल, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणामुळे सातारा पोलीस विभागाचे काम अत्यंत चांगले सुरु आहे. सातारा जिल्ह्याला मोठी परंपरा आहे. शासनाच्या योजना राबविण्यात जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. पोलीस विभागाच्या नाविन्यपूर्ण कामांना नेहमीच सहकार्य राहील.
पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, सातारा पोलीस दलाचे चांगले काम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात गुन्हे उघड करण्यात यश आले आहे. पोलीस कल्याण निधीतून आफिस क्लबचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामुळे बाहेरुन येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची राहण्याची सोय होणार आहे. तसेच पोलीस विभागासाठी कॅन्टींन सुरु करण्यात येणार आहे. पोलीस विभागाला जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिल्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे आभारही त्यांनी मानले. या कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.