उंडाळेतील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा सारंग बाबांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । शेतकऱ्यांना पिकाची उत्पादकता व उत्पादन वाढीसाठी कृषिविषयक अद्ययावत माहिती मिळणे गरजेचे आहे. उंडाळे येथील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येईल. असा विश्वास व्यक्त करून माजी मंत्री स्व.विलासराव पाटील यांनी कायम लोकहितासाठी कार्य केले, असे प्रतिपादन ‘राष्ट्रवादी’च्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला.

उंडाळे, ता. कराड येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रयत सह.साखर कारखान्याचे चेअरमन ॲड.उदयसिंह पाटील, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडल कृषी अधिकारी शितल नांगरे, उदयआबा पाटील, सचिन काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सारंग पाटील म्हणाले, सहकारी चळवळीला दिशा देणार्‍या स्व.विलासराव पाटील काकांच्या उंडाळे गावी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून हे काम होत असल्याचा आनंद आहे. ह्या दोन नेत्यांमध्ये ऋणानुबंध व अनोखे नाते राहिले आहे. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पठडीत त्यांची जडणघडण झाली आहे. काकांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडताना येथील सर्वसामान्य नागरिकाच्या हिताचा विचार केला. त्याचे प्रतिबिंब त्यांनी केलेल्या कामातून दिसून येते. अभ्यासपूर्ण व दूरदृष्टी ठेवून केलेल्या कामामुळे त्यांची नाळ येथील जनतेशी घट्ट जुळली गेली आहे.

उदयसिंह पाटील म्हणाले, आजच्या युवा पिढीला योग्य दिशा देण्याची गरज निर्माण झाली आहे. थोर महात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान, देश उभा करताना केलेला त्याग,  त्यांचे परिश्रम याची आठवण करून दिली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी काम केल्याची जाणीव ठेवली पाहिजे. स्वाभिमान आणि विचाराचे अधिष्ठान टिकवण्यासाठी प्रयत्‍न करणे गरजे आहे. तसेच सामाजिक एकोपा जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असायला हवे. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांचे स्वागत दादासो पाटील यांनी केले तर आभार अजित कदम यांनी मानले. यावेळी मनोज डांगे, प्रमोद चौधरी, बाळासाहेब तोरणे आदींसह विभागातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.