सातारा प्रतिनिधी | सध्या पावसाळा सुरु असून पावसाचे पाणी साठल्याने त्याठिकाणी साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांचा नायनाट केला पाहिजे. आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सार्वजनिक ठिकाणची डबकी तसेच प्लास्टिक कचरा यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. साथरोग नियंत्रणासाठी महास्वच्छता अभियान उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
जावळी तालुक्यातील कुडाळ येथे साथरोग नियंत्रण मोहिमे अंतर्गत महास्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे , गटविकास अधिकारी मनोज भोसले , गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, सरपंच सुरेखा कुंभार.उपसरपंच सोमनाथ कदम. ग्रा. प. सदस्य विरेंद्र शिंदे. जगन्नाथ कचरे, धैर्यशील शिंदे, जिल्हा तज्ञ अजय राऊत, विस्तार अधिकारी श्री. सुरवसे, श्री.पवेकर, बीआरसी संतोष जाधव, रमेश शिंद , रुचा परामणे, ग्रामसेवक रजनिकांत गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नागराजन यांनी ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पिंपळबन, प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली. जि. प. प्राथमिक शाळेत जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व हात धुण्याचे महत्व समजावून सांगितले.