कराड प्रतिनिधी | दुर्गम भागात विकासाकामे झाली तरच लोकांचे राहणीमान सुधारेल आणि खऱ्या अर्थाने भागाच्या विकासाला चालना मिळेल, या विचारातून खा. श्रीनिवास पाटील यांनी विकासासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच परळी विभागात कोट्यावधीची विकासकामे झाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.
सातारा तालुक्याच्या परळी विभागातील परळी, चिखली, जांभे, चाळकेवाडी, वावदरे, रेवंडी, राजापुरी, बोरणे, पांगारे याठिकाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विकासकामा संदर्भात कार्यपूर्ती संपर्क दौऱ्यातील गावभेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन संपन्न झाले.
सारंग पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या टोकापर्यंत विकासकामे पोहचली पाहिजेत अशी भूमिका खा.श्रीनिवास पाटील यांची आहे. त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रशासनातील गाढा अभ्यास व लोकप्रतिनिधी म्हणून असलेला अनुभव याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे. ग्रामीण भागातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गावागावात मूलभूत सेयीसुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. तेथील रस्ते, वीज, पाणी, मोबाईल टॉवर, स्मशानभूमिच्या कामांसह अन्य कामे साकारल्यास विकासाला चालना मिळेल. खा.श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून अशी विविध कोट्यावधींची कामे विभागात होत आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार अनेक कामे मार्गी लागत असल्याने स्थानिकांच्या चेहर्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. याप्रसंगी सुरज किर्तीकर, पोपटचंद पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.