सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी या ठिकाणी घडलेल्या दंगलीमुळे पोलिस प्रशासन चांगलेच अलर्ट झाले आहे. दरम्यान, पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुणे पोलिसांकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
आज सकाळपासून पुणे शहर आणि जिल्ह्याभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पुणे पोलिसांनी पुणेकरांना केलं आहे. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्यास पुणे पोलीस कडक कारवाई करणार आहे. आगामी गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पुणे पोलीस सरसावले आहेत.
पुसेसावळीत तणावपूर्ण शांतता
दोन दिवसांपासून विटा, कऱ्हाड भागातून बंद असलेली वाहतूक सकाळपासून पुसेसावळी (बायपास मार्गे) पुन्हा सुरू करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुसेसावळीत तणावपूर्ण शांतता असून, प्रार्थनास्थळ, मंदिरांना मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुसेसावळीत मुख्य बाजारपेठ पूर्णत: बंद असून, अन्य भागातील दुकाने सायंकाळच्या सुमारास काही प्रमाणात उघडण्यात आली. पुसेसावळी व परिसरातील शाळादेखील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत.