सातारा प्रतिनिधी | उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने जादूटोणा विरोधी कायदा राष्ट्रीय पातळीवर लागू करावा. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी, अशा महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. तसेच दुर्घटनेतील मृतांबद्दल शोक संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.
निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी
हाथरससारख्या घटनांना प्रत्यक्ष जबाबदार असणारे बाबा, बुवा, संबंधित प्रशासकीय अधिकारी हे नामानिराळे राहतात आणि काही प्याद्यांचा बळी दिला जातो. ही बाब लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी अंनिसने केली आहे.
राजकीय नेत्यांनी बुवा, बाबांना पाठीशी घालू नये
अंनिसच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात करण्यात आलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि लोकांना फसवणे, हा गुन्हा आहे. असाच कायदा देशभर लागू केल्यास भोलेबाबासारख्या बाबांना आळा बसू शकेल, असा विश्वास अंनिसने व्यक्त केला आहे. राजकीय नेते मतांसाठी अशा बुवा, बाबांना पाठीशी घालतात. हे थांबण्याची आवश्यकता असल्याचंही अंनिसने म्हटलं आहे.
राज्यसभेतील मागणी स्वागतार्ह
खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी राज्यसभेत केली आहे. त्यावर सभापती जगदीश धनकड यांनी देखील दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी चर्चा करून सभागृहात मांडण्यास सांगितलं. राज्यसभेत झालेल्या या चर्चेचं अंनिसने स्वागत केलं आहे.
सर्वधर्मीय अंधश्रध्दा निर्मूलन करणारा कायदा
महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांच्या काळात या कायद्याच्या झालेल्या अंमलबजावणीतून सर्वधर्मीय बुवा, बाबांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली. त्यामुळे हा कायदा सर्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मूलन करणारा ठरला असल्याचे सिद्ध झाले आहे. या कायद्याचा गैरवापर झाल्याची एकही घटना समोर आली नसल्याचे अंनिसने निदर्शनास आणून दिलं आहे.
सर्वपक्षीय खासदारांनी कायदा संसदेत मांडावा
अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांना जादूटोणा विरोधी कायद्याची प्रत देवून हा कायदा संसदेत मांडण्याची विनंती करणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी, या अभियानात तयार झालेल्या पंचवीस पुस्तिका हिंदीमध्ये अनुवादीत करून हिंदी भाषिक लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही अंनिसने पत्रकाद्वारे सांगितलं आहे.