कराड प्रतिनिधी | कराड येथे विभागीय संपर्क नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा, सांगली जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यावेळी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्तेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याचा पारा चांगलाच वाढला आणि त्याने संतापाच्या भरात माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार भास्कर जाधव यांच्यासमोर घडल्याने याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा आज दुपारी कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात पारा पडला. घेण्यात आला. या मेळाव्यास पक्षाचे विभागीय संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानगुडे-पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यास कराड, सातारासह सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी पदाधिकारी उपस्थित होते.
कराड येथील मेळाव्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यादरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्यासमोरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जोरदार वादावादी होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर पुढे वाद वाढत गेल्याने त्याचे रूपांतर मारामारीत झाले. शिवसेनेच्या सांगलीतील विद्यमान पदाधिकाऱ्याचा डोक्याचा पारा छडल्याने त्याने रागाच्या भरात माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या कानाखाली लावली. अचानक घडलेल्या वादावादीच्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकारानंतर सभागृहात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी स्थानिक व वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.