कराडात जरांगेच्या पाठिंब्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने ठेवली बंद तर युवकांनी काढली बाईक रॅली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्य सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी राज्यभरात मराठा बांधवांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराड येथे सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली तर युवकांनी देखील दुचाकी रॅली काढत पाठिंबा दर्शवला.

कराड येथे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने कराड शहरातून मराठा समाजातील युवकांनी ‘एक मराठा.. लाख मराठा’ अशा घोषणा देत दुचाकी रॅली काढली. यावेळी दुचाकी रॅलीमध्ये मोठ्या संखेने युवक सहभागी झाले होते. तर कराड तालुका मराठा समाजाच्यावतीने तालुक्यामध्ये शांततेच्या मार्गाने बंद ठेवत सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले होती. त्यानुसार आज शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

दरम्यान, काल कराड तालुका सकल मराठा समाज बांधवाच्यावतीने तातडीची बैठक घेतण्यात आली होती. त्यामध्ये जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज कराड शहरातील मराठा समाज बांधवांच्या वतीने व व्यापाऱ्यांच्यावतीने दुकाने बंद ठेवत पाठिंबा देण्यात आला. आज मराठा समाज बांधवांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यांच्या बंदला सर्वत्र पाठिंबा देण्यात आला आहे. कराड येथे ही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, दिवसभर कराड एसत आगारातील 84 एसटीच्या सर्व 724 फेऱ्या सुरळीत राहिल्या.