सातारा प्रतिनिधी | बेडग (ता. मिरज, जि. सांगली ) येथील ग्रामस्थांनी स्वागत कमान बांधण्यासाठी मुंबईकडे लाँग मार्च सुरू केला आहे. दरम्यान, हा लाँगमार्च साताऱ्यात पोचल्यानंतर त्यातील ७ जणांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच सांगली जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सरकारी रुग्णालयात भेट देत आंदोलकांच्या प्रकृतीची चाैकशी देखील केली.
बेडग येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आणि ती पुन्हा बांधण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी मुंबईला जाण्यासाठी लाँग मार्च सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथून याला सुरुवात झाली. हा लाँग मार्च पुणे-बंगळुरु महामार्गाने जात असून गुरुवारी साताऱ्यात आंदोलक आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर पाच जणांना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी दाखल केले. तर, शुक्रवारी सकाळी आणखी तिघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामधील एकाला उपचारानंतर सोडण्यात आले आहे. सध्या ७ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
साताऱ्यात आंदोलकांवर उपचार सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी डाॅ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे हे शुक्रवारीच जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. त्यांनी उपचार घेत असणाऱ्या आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रकृतीबद्दल माहिती घेतली. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.