खंबाटकी घाटात भीषण अपघात; मालट्रकने 4 कारला उडविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा – पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात तामिळनाडू वरून मुंबईकडे जाणाऱ्या मालट्रकचा ब्रेक फेल झाल्याने, ट्रकने लागोपाठ चार कार गाड्यांना उडविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मालट्रक चौथ्या कारला अडकून राहिल्यामुळे सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला, तर कारमधील लोकांचे प्राण ही वाचले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास या घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर ‘एस कॉर्नर’वर मागून येणाऱ्या ट्रकचा (टीएन 46 एस 14 99) ब्रेक फेल झाला. येथे उतार असल्याने ट्रकचा वेग वाढला. त्यामुळे ट्रकाने पुढील चार गाड्यास जोराने ठोकरले. त्यानंतर या गाड्या रस्त्याच्या बाजूला जाऊन पडल्या.

दरम्यान, हा ट्रक चौथ्या कारला अडकून राहिला. यामुळे सुदैवाने ट्रक चालकाचा जीव वाचला, तर कारमधील लोकांचे प्राण ही वाचले. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना घडताच भुईंज महामार्ग पोलीस यांच्या नेतृत्वाखाली निंबाळकर, गायकवाड, खंडाळा पोलिस परांदे व इतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.