मुख्याधिकारी शंकर खंदारेंच्या कराड पालिकेतील कामाची चौकशी करावी, अन्यथा उपोषण करू; इम्रान मुल्ला यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

0
741
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील एक बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागून त्यामधील पाच लाख रुपये स्वीकारताना कराड नगर परिषदेचे कार्यमुक्त मुख्याधिकारी यांच्यासह नगर रचना विभागातील सहाय्यक नगररचना अधिकारी, बांधकाम विभागातील लिपिक व एका खासगी व्यक्तीला लाचलूचपत विभागाने सलग पाच दिवस सापळा रचून नुकतीच कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर आता मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या कामाची व त्यांच्यासह श्री. काकडे व मयूर शर्मा या तिघांची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा तीव्र बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू करू, असा इशारा राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वंयरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. शंकर खंदारे यांची बदली झाल्यानंतर ऑर्डर मिळालेली असतानाही त्यांनी श्री. मयूर शर्मा अकाउंटंट व काकडे आरोग्य अभियंता प्रभारी यांच्याशी संगणमत करून लाखो करोडो रुपयांचे चेक अदा केलेले आहेत. मुख्याधिकारी श्री. शंकर खंदारे यांची बदली झालेली असताना घाई गडबडीने त्यांनी ठेकेदारांची १५ टक्के घेऊन लाखो करोडो रुपयांची धनादेश बदली झाल्यानंतरच का काढले? बदली होण्यापूर्वी का काढले नाहीत? याचे उत्तर या तिन्ही अधिकाऱ्यांनी द्यावे.

अधिकार नसताना अधिकाराचा यांनी गैरवापर करून ज्या ठेकेदारांची बिले अदा केली आहेत त्या सर्व ठेकेदारांच्यासोबत यांचे लागेबांधे आहेत का? या ठेकेदारांनी किती मलिदा या तीन अधिकाऱ्यांना दिलेला आहे? याची चौकशी होणे खूप गरजेचे आहे. सदर चौकशी आपल्या अधिकारात समिती नेमून संबंधितांची चौकशी करावी, अन्यथा आपल्या कार्यालयाबाहेर नाईलाजाने संघटनेकडून बेमुदत प्राणांतिक उपोषण सुरू करावे लागेल, याची नोंद गांभीर्याने घ्यावी, असा इशारा राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वंयरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.