सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शनिवारी रात्री एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांबद्दल तक्रारींचा पाढा वाचत त्यांच्याविषयी अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांना माहिती दिल्याचे सांगितले. यावेळी रामराजे यांनी शरद पवार यांना मी दोनवेळा भेटलो, अशा बातम्या सुरू आहे. पण ज्या माणसाने मी आमदार नसताना मला मंत्री केले आणि त्या माणसाला पक्षफुटीवेळी सोडून मी अजित पवार यांच्याकडे गेलो. कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू तुम्हीच सांगा? असे विधान रामराजे यांनी केले. त्यांच्या या केलेल्या विधानामुळे ते शरद पवार गटात जाण्यास इच्छुक असल्याचे एकप्रकारे दिसत आहे. तसेच अजित पवार गटात धुसफूस सुरू असल्याचे देखील उघड झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये शनिवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक गोष्टीबाबत मत व्यक्त केले. यावेळी रामराजे म्हणाले की, आज दिवसभर मी अजित पवारांना सोडून जाणार, अशा बातम्या माध्यमं देत होती. आपल्या विरोधकांनी या कंड्या पिकवल्या का? हे पाहावे लागेल. कारण त्यांना असले उद्योग करण्याची घाण सवय आहे. कारण आपण पवारसाहेबांकडे गेलो तर भाजपच्या चिन्हावर त्यांना फलटणची जागा लढायला मिळेल, असा त्यांचा उद्देश असेल.
दीपक चव्हाण यांच्याकडून खूप अपेक्षा…
फलटण तालुक्याचे सलग चौथ्यांदा दिपक चव्हाण हे आमदार व्हायला निघाले आहेत. त्यांना आपण पुन्हा निवडून द्यायचंय. फलटणमध्ये कुणीही चौथ्यांदा निवडून आले नाही. पण यंदा दिपक चव्हाण यांच्यामागे आपल्याला ताकदीने उभा राहायचे आहे. दिपक चव्हाण तुम्हाला बोलताना वागताना विचार करुन, जबाबदारीनं वागावं लागेल. आमच्या घराण्याचं राजकीय कल्चरही सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. आतापर्यंत तुम्ही व्यवस्थित सगळं पार पाडलं, आताही पाडाल, अशी अपेक्षाही रामराजेंनी बोलून दाखवली.
पवार साहेब सत्तेत नसल्यामुळे अजित पवारांकडून अपेक्षा…
पवार साहेब आज सत्तेत नाही. त्यामुळे आपण अजितदादांकडून अपेक्षा ठेवली आहे, कारण ते सत्तेत आहेत. अपेक्षा जो पर्यन्त पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी माझ्या लोकांना काही उत्तरं देऊ शकत नाही. अशी परिस्थिती माझ्या नेत्याने माझ्यावर आणू नये, असेही रामराजे यांनी म्हटले.
रामराजेंच्या नाराजीचं नेमकं कारण काय?
माजी जलसंपदा मंत्री आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे १९९५ ला आमदार झाले. तेव्हापासून २०१९ पर्यंत ते मंत्रिमंडळात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर गेले. ” विधानपरिषदेचे सभापती असतानादेखील मला तुरूंगात टाकायची तयारी रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरेंनी केली होती,” असा गौप्यस्फोट रामराजेंनी जाहीर सभेत केला. “ही बाब मी देवेंद्र फडणवीसांनाही सांगितली होती. अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतरही भाजपानं निंबाळकर, गोरेंना समज दिली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आणि अस्वस्थ आहेत.”