सातारा प्रतिनिधी | केंद्रात सध्या मोदी सरकार आहे. या सरकारने आतापर्यंत जी काही कृत्य केली आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट असून इंडिया आघाडीच्या माध्यमातून केंद्रातील सरकार उलथून पडेल. राज्यातही महाविकास आघाडी मजबूत असून 2024 मध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करत कॉंग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचे विधान केले.
कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर सातारा येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. पत्रकार परिषदेस जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण- पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, प्रदेश सचिव धनश्री महाडिक, सरचिटणीस नरेश देसाई आदी उपस्थित होते.
माजी आमदार चौधरी म्हणाल्या, केंद्रातील भाजप सरकारने प्रति सिलेंडर 1100 रुपयांच्या माध्यमातून जनतेच्या खिशातले 8 लाख 33 हजार कोटी तर उज्वला गॅसद्वारे 2017 पासून 68 हजार 700 कोटींपेक्षा जास्त रक्कम महिलांकडून लुटली आहे. देशातील जनेतला उल्लू बनवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. राजस्थान, तेलंगणा, मिझोरम यांसह पाच राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गॅसचे दर दोनशे रुपयांनी कमी केली.
गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा…
जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार निंदनीय असून या घटनेतील दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. याचबरोबर राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेबाबत माफी मागितली असल्याने, त्यांनी लाठीमाराचे आदेश दिले असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी केली.