सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसने प्रचारयंत्रणा राबविलेल्या भागात महाविकास आघाडी उमेदवाराला मताधिक्य मिळाले. काॅंग्रेसची जिल्ह्यात ताकद आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला आठपैकी चार जागा मिळाव्यात असा ठराव काॅंग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. तसेच विधानसभेला जिल्ह्यातील ५० टक्के जागा लढविण्याचा ठाम निर्धारही पदाधिकाऱ्यांनी केला.
येथील जिल्हा काॅंग्रेस कमिटीत जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर बैठक झाली. यामध्ये लाेकसभा निवडणुकीचा आढावा आणि आगामी विधानसभेबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपले मते व्यक्त केली. या बैठकीला जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, काॅंग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर राजकीय चर्चा करण्यात आली. यावर जिल्ह्यातील सर्वच तालुकाध्यक्षांनी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५० टक्के म्हणजे विधानसभेचे आठपैकी चार मतदारसंघ काॅंग्रेसला देण्याची मागणी जिल्हा काॅंग्रेस कमिटीने प्रदेश काॅंग्रेसकडे करावी. त्याचबरोबर काॅंग्रेसनेही महाविकास आघाडीसमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवावा. जिल्हा काॅंग्रेस कमिटीनेही माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्यामार्फत ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली.
पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांनी बैठकीत तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मते व्यक्त केली आहेत. याबाबत जिल्हा काॅंग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीकडे प्रस्ताव पाठवून निम्म्या जागा मागेल. तसेच या मागणीवर आपण ठाम राहू, असे स्पष्ट केले. तर जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केले. महाविकास आघाडी उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला, याची सल आहेच. आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी तयार रहावे. जिल्ह्यातील विधानसभेचे अधिकाधिक मतदारसंघ काॅंग्रेसकडे घेण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. तसा प्रयत्न प्रदेश काॅंग्रेस कमिटीकडे करेन, असे आश्वासन दिले.