तुम्हालाही बंदुकीचा परवाना काढायचाय? शस्त्र परवाना मिळविण्यासाठी करावी लागते ‘ही’ प्रक्रिया

0
936
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । स्वसंरक्षणासाठी शस्त्र मिळावे यासाठी अनेक जण रीतसर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवाना घेऊन ‘शस्त्र’ बाळगतात. ग्रामीण भागात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवाना दिला जातो. तो तीन वर्षांसाठी असतो. तत्पूर्वी परवान्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या आकडेवारी बाबत सांगायचे झाल्यास ८३८ जणांकडे शस्त्रपरवाना आहे. या परवानाधारकांना काडतूस वापरण्याची मर्यादा असून, त्यांना मागणीनुसार ती दिली जातात. स्वसंरक्षण, बँकिंग अथवा वेगवेगळ्या कारणांसाठी परवाना दिला जातो. जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत, त्यांनी आपले शस्त्र नजीकच्या पोलीस ठाण्यात जमा करावे लागते.

विधानसभा निवडणुका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींकडे शस्त्र परवाना व शस्त्र नाहीत.

जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत. त्यात बिल्डर, नेते, व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना स्वसंरक्षणार्थ ते परवाने देण्यात आले आहेत. तर काही परवाने हे पीक संरक्षणासाठी दिले आहेत. त्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण हे जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेकडून केले जाते. परवान्यासाठी अर्ज आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलिसांकडे रिपोर्ट मागविला जातो. पोलिसांकडून सविस्तर चौकशी केली जाते. अर्जदाराच्या जिवाला खरोखरच धोका आहे का, हेही तपासल्यानंतर परवाना देण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

खरं तर बंदूक परवाना हा काही विशिष्ट कारणांसाठी दिला जातो. एखाद्याला दुसऱ्यापासून धोका आहे, असे वाटत असेल तर स्वसंरक्षणासाठी तो परवान्याची मागणी करू शकतो. त्याचबरोबर शेतीचे प्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठीही शस्त्र परवाना दिला जातो. ही प्रामुख्याने दोन कारणे शस्त्रांचा परवाना देण्यापाठीमागची असतात. मात्र, अनेक जण या दोन्ही कारणांचा वापर केवळ फॅशन म्हणून करतात. आपल्याकडे पिस्तूल आहे, हे समजण्यासाठी अनेक जण कमरेला पिस्तूल लावून समाजात फिरत असतात. यामुळे आपली प्रतिष्ठा वाढेल, अशी त्यांची समजूत असते.

शस्त्र परवान्याचे प्रकार किती?

तीन प्रकारची शस्त्रे बाळगण्यासाठी परवाना मिळतो. शॉटगन, हॅन्डगन आणि स्पोर्ट गन या तीन प्रकारांच्या गन्सला परवाना मिळतो, तसेच त्याला काडतूस दिल्यानंतर त्याने किती वापरले याचा हिशोब शस्त्र परवाना नूतनीकरणावेळी द्यावा लागतो.

तुम्हालाही मिळेल शस्त्र

स्वसंरक्षणार्थ व पीक संरक्षणार्थ शस्त्र परवाना दिला जातो. अर्जदाराच्या जिवाला खरोखरच धोका आहे का, हेही तपासल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होते.

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी काय करावे?

  • शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज फॉर्म A भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात.
  • अर्ज फॉर्मवर कोर्ट स्टॅम्प लावणे आवश्यक आहे.
  • शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्जदाराची गुन्हेगारी नोंद तपासली जाते.
  • शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्जदाराकडे शस्त्र सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य जागा असावी लागते.
  • अर्जदाराकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असावे की तो शारीरिक आणि मानसिकदृष्टया शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे.

कोणकोणती कागदपत्रे ?

शस्त्र परवान्यासाठी ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. पासपोर्ट साइज फोटो, मतदान ओळखपत्र, मागच्या तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न, कोणती गन घेणार, त्याची माहिती द्यावी लागते. दोन व्यक्तींकडून चारित्र्य, फिटनेस, शैक्षणिक, जन्म प्रमाणपत्र अन् शस्त्र बाळगण्याचे समर्पक कारण द्यावे लागते. तसेच, हे शस्त्र बाळगण्याची आवश्यकता पटवून द्यावे लागते.

अर्ज कोठे, कसा कराल?

जिल्हाधिकारी कार्यालयातील परवाना शाखेकडून छापील अर्ज घ्यावा लागतो. आवश्यक दस्तऐवज जोडून तो अर्ज त्याच परवाना शाखेकडे जातो. पोलिसांकडून खातरजमा झाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण केली जाते.