पाणीपट्टी आकारणीबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांचे कराड पालिकेस महत्वाचा आदेश; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरात पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दररोज सकाळी व सायंकाळी पाणी पुरवठा १५ मिनिटे कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाणीपुरवठा कमी वेळ होत आहे. तसेच पालिकेडून पाणीपट्टी आकारणी मध्ये दरवाढ केली असल्याने याबाबत नागरिकांडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालिकेच्या दरवाढीच्या निर्णयास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आता जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कराडचे मुख्याधिकारी खंदारे यांना आज दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेस दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कराड पालिकेने पाणीपट्टी बिलामध्ये केलेली वाढ कमी करण्याबाबत कराड येथील नागरिकांच्या विनंती अर्ज केला होता. त्यानुसार स्थानिक नागरिकांच्या अर्जाच्या विचार करून कराड पालिकेने पाणीपट्टी आकारणीमध्ये केलेल्या वाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, जुन्या दराने पाणीपट्टी आकारणी करण्यास स्थगिती देण्यात आली नाही.

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून नियमानुसार जुन्या दराने पाणीपट्टी आकारण्याची कारवाई तात्काळ सुरू करण्यात यावी. चालू आर्थिक वर्षातील तसेच सन 2022-23 व त्यापूर्वीची थकीत पाणीपट्टी वसुलीची कारवाई तात्काळ सुरू करून केले कार्यवाहीबाबत कार्यालयास अवगत करावे, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे.