सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून आपल्या सर्वांच्या विचाराचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहू, असे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे व संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
आ. बबनदादा शिंदे यांच्या माढा येथील निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्यामध्ये खागी बैठक पार पडली. आगामी माढा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने यांच्यात विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत. त्यामध्ये पाणी प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असून मतदारसंघांमधील सर्वांना पाणी मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितरित्या काम करून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्व प्रलंबित प्रश्न आगामी काळामध्ये कसे सोडवता येतील; याबाबत आपण आग्रही राहून कामकाज करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून मतदारसंघांमध्ये प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित कामकाज करणे आवश्यक आहे. त्यानुसार आगामी माढा लोकसभा मतदारसंघाची सर्वांनी एकत्र मिळून रणनीती ठरवून आपण मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही राहू, असे मत यावेळी आ. बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी संजयमामा शिंदे म्हणाले की, आगामी काळामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या सर्वांच्या एक विचाराने उमेदवार देऊन त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण मिळून कार्यरत राहू.