कराड प्रतिनिधी । २६० कराड दक्षिण व २५९ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राज्य उत्पादन शुल्क असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, जड वाहन वाहतूकदार संघटना, सहकारी बँका व पतसंस्था आदी विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज तहसील कार्यालयात यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण व कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दृष्टीने महत्वाचे निर्देश दिले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, उत्पादन शुल्क पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढोणे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, दुय्यम निरीक्षक सब इन्स्पेक्टर उमा पाटील, दुय्यम निरीक्षक सब इन्स्पेक्टर शरद नरळे, जिल्हा उपनिबंधक संजय जाधव, नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क तसेच केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, वाहन वाहतूकदार व सहकारी बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अतुल म्हेत्रे म्हणाले, १५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर अखेर भारत निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. यादरम्यान दररोजचे रेकॉर्ड अपडेट ठेवणे सर्वांना बंधनकारक राहील. एक्साईज डिपार्टमेंट वेळोवेळी तपासणी करणार आहे. ड्रायडे चे १०० टक्के व तंतोतंत पालन करावे, तक्रार आल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही तर कठोर कारवाई केली जाईल. रात्रीच्या घालून दिलेल्या वेळेचेही तंतोतंत पालन करावे. बल्क स्टॉक कुठे व कशासाठी नेला जातोय याची खात्री करावी.
कराड उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण म्हणाले, निवडणूक निरीक्षक (ऑब्झर्वर) यांचे कराड येथे वास्तव्य असून सूक्ष्म निरीक्षण राहणार आहे. वेळेत रेकॉर्ड अपडेट ठेवून वेळेत दुकाने बंद करावीत. उत्पादन शुल्क चे अधिकारी बापूसो डोणे यांनी सीसीटीव्ही फीडबॅक दोन महिन्याचे ठेवावे. भरारी पथकाची तपासणी होईल. स्टॉक पेक्षा जास्त खप झाला तर लेखी ठेवा. अधिकचा स्टॉक ठेऊ नये अशी सूचना केल्या.
अत्यावश्यक सेवा असल्याने २४ तास दुकाने खुली राहतील, बंधने नाहीत परंतु डॉक्टरांनी दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिली जाणार नाहीत व तालुक्यात ट्रान्सपोर्ट, स्टोअरेज व सेल होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहनांचे इन्शुरन्स, टॅक्स इत्यादी कागदपत्रे परिपूर्ण असावीत. तसेच वाहन चालकांचे लायसन्स अपडेट हवे. निवडणूक कामासाठी वाहने लागणार असून ती सुस्थितीतील व वेळेत हजर ठेवावीत, असे म्हेत्रे यांनी सांगितले.
सहकारी बँका व पतसंस्थांना केल्या ‘या’ सूचना
सहकारी बँका व पतसंस्थांच्या व्यवस्थापन व अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कराड दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, भारत निवडणूक आयोग नवी दिल्लीच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका होत असून आपण सर्वजण भारत निवडणूक आयोगाकडे प्रतिनियुक्तीवर काम करत आहोत. त्यामुळे कुठेही चुकीला क्षमा नाही असे गृहीत धरून पारदर्शकपणे काम करावे. निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शकपणे पार पडणे महत्त्वाचे आहे. आचारसंहितेमध्ये कॅशची ने-आण करणाऱ्यांनी सहकारी संस्था, बँका, पतसंस्था यांच्याकडील बारकोड स्टॅम्पची चिठ्ठी बरोबर ठेवावी व दुय्यम निबंधकाचा परवाना सोबत ठेवावा. ते पुढे म्हणाले, कराड उत्तरेत ५ तर दक्षिणेत ४ फ्लाईंग स्क्वाड व तेवढीच स्थिर पथके कार्यरत आहेत. आजपासून मतमोजणी होईपर्यंत तालुका जिल्हा व मुंबई पर्यंत लाईव्ह कास्टिंग १०० टक्के सुरू राहणार आहे. कॅश विड्रॉल डेली ची आणि आत्ताची जास्त तफावत आढळल्यास कारवाई होईल, त्यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचना सातारा जिल्हा उपनिबंधक संजय जाधव यांनी केल्या.