पर्यटनस्थळांवर सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा आणि जावळी तालुक्यात प्रतिवर्षी पावसाळी पर्यटन प्रारंभ होतो. भांबवली, वजराई, ठोसेघर आदी धबधबे पहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते; मात्र गोंधळ आणि हुल्लडबाजी यांमुळे सातत्याने दुर्घटना घडत असतात.
अशा पर्यटनस्थळी पर्यटनास बंदी करण्यात आली आहे; मात्र त्याचा परिणाम स्थानिक भूमीपुत्रांच्या उद्योग-व्यवसायावर होऊन त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. स्थानिकांचे हाल होऊ नयेत; त्यांचा चरितार्थ सुरळीत चालू रहावा, यासाठी पर्यटनही चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे बंद ठेवण्याऐवजी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना तातडीने करा, अशा सूचना सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत माहिती घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या भेटीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी आ. भोसले म्हणाले, ”पर्यटनस्थळी आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा कठडे बांधणे, लोखंडी बॅरिकेट्स लावणे, सुरक्षा रक्षक उपस्थित ठेवणे आदी उपाययोजना कराव्यात, तसेच पर्यटनस्थळी हुल्लडबाजी आणि गोंधळ करून कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे. स्थानिक भूमीपुत्रांचाही विचार करून त्यांचा चरितार्थ सुरळीत चालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्णय घेतले पाहिजे.”, असे भोसले यांनी म्हटले.